औरंगाबाद / प्रतिनिधी
निकृष्ट सिमेंटच्या पोत्यांची बाजारात कमी दराने विक्री करुन हिमाचल व हरियाणा राज्यातील कंपनी जनतेची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरुन एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात दोन ट्रेडर्स मालकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकी हार्डवेअरचा मुश्ताक अमीर पठाण आणि समीर ट्रेडर्सचा मालक समीर सिराज पठाण यांच्याविरुध्द कारवाई अशी तक्रार मुंबईच्या टर्क डिटेक्टिव कंपनीचे फिल्ड ऑफीसर महेश अर्जुन मुखीया (24, रा. सि-4, दिपाली निवास, कारगिल नगर, विरार ईस्ट, पालघर) यांनी केली आहे.
मुंबईतील टर्क डिटेक्टिव कंपनी व अल्ट्राटेक सिमेंट लिमीटेड यांच्यात बनावट उत्पादन विक्री करणा-या व्यवसायिकाविरुध्द पोलिसांची घेऊन कायदेशिर कारवाई करण्याचे अधिकार करण्याबाबत करार झाला आहे. या कराराअन्वये टर्क डिटेक्टीव कंपनीने पोलिसांची मदत घेऊन कायदेशिर कारवाई करण्याबाबत 27 सप्टेंबर 2019 रोजी अधिकार पत्र दिले आहे. अल्ट्राटेक सिमेंट लिमीटेड कंपनीला त्यांच्या सिमेंटची मिक्सींग करुन बनावट मालाची विक्री होत असल्याबाबत अनेक ग्राहकांनी वारंवार तक्रारी केल्या. त्याबाबत अल्ट्राटेक सिमेंट लिमीटेड कंपनीने टर्क डिटेक्टीव कंपनीला कळविले. त्यावरुन कमळापुर रोडवरील लकी हार्डवेअर व समीर ट्रेडर्सचे मालक कंपनीच्या नावाच्या बनावटी सिमेंटच्या गोण्या व त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे सिमेंट मिक्सींग करुन हुबेहुब दिसणा-या पोत्यांव्दारे बाजारात सर्रास विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हे पोते हिमाचल व हरियाणा राज्याचे आहेत. त्यांची विक्री बाजारात कमी दराने होत असल्याची खात्री पटल्यावर कंपनीचे संचालक प्रभाकर शंकराव भोसले यांनी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, शिपाई साळुंखे व वेताळ यांनी 3 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हार्डवेअर व ट्रेडर्सवर छापा मारुन अल्ट्राटेक कंपनीच्या बनावट सिमेंटचे 49 बनावट पोते जप्त केले. त्यावरुन एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.