मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती भडकले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर दिसत नाही. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठापुढे व्हावी असे सरकारला वाटत होते तर दीड महिन्यांपूर्वीच ही मागणी का केली नाही? आता मागणी करून दीड महिना वाया का घालवला? असा सवाल संभाजीराजेंनी सरकारला केला आहे. मी अनेकदा सरकारला सूचना केल्यात. अशोक चव्हाण यांच्याशी बोलणे झाले आहे. पण उपसमितीची बैठक झालेली नाही. राज्य सरकार असे का करतेय? मराठा समाजाला असे गृहित का धरता? का खेळखंडोबा करता?, संताप त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. तत्पूर्वी राज्य सरकारचे वकील सुनावणीला हजर न राहिल्याने काही काळ सुनावणी स्थगित करावी लागली होती. राज्य सरकारच्या या भोंगळ कारभाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. राज्य सराकरच्या या हलगर्जी कारभारमुळे खासदार संभाजीराजे भडकले आहेत. संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सरकारचे वकील हजर राहत नाहीत, हे दुर्दैव आहे. अत्यंत गंभीर बाब आहे. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी याकडे लक्ष द्यायला हवे आहे. ते जिथे कुठे असतील तिथून त्यांनी समन्वय साधायला हवा. सामान्य प्रशासन विभागाच्या संबंधित सचिवांना सूचना द्यायला हव्या,' असे आवाहन संभाजीराजे यांनी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. राज्य सरकारच्या वकिलांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणे गरजेचे आहे. यावर अधिक काय बोलणार संभाजीराजे म्हणाले.

चव्हाणांना ह्या गोष्टी कळत नाहीत का?  : मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे, संभाजीराजे संतापले आहे. ते म्हणाले की, चव्हाणांना किती बोलायचे? सरकारला आणखी काय सांगायचे? फोन करून काय करू? अशोक चव्हाणांना ह्या गोष्टी कळत नाहीत का? मी आणखी नवीन काय सांगणार? माझा जीव धोक्यात घालून मी महाराष्ट्रात फिरतोय. गर्दीत फिरतोय. सरकारने गांभीर्याने पावले उचलावीत, असे संभाजीराजे म्हणाले आहे.

सरकार दोषी : संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या नियोजनावरून राज्य सरकारवर टिका केली आहे.मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्याला सरकार दोषी आहे, असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. ते म्हणाले की, दीड महिन्यापूर्वी सरकारने कोर्टाला एक पत्र दिले होते. त्यात योग्य त्या खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याची विनंती राज्य सरकारने कोर्टाला केली होती. तेव्हा घटनापीठाची मागणी केली नाही. आज मात्र चुकून हे प्रकरण या खंडपीठाकडे आले असून हे प्रकरण घटनापीठाकडे द्यावे असे राज्य सरकारने कोर्टाला सांगितले. हे प्रकरण घटनापीठाकडेच जावे अशी सर्वांचीच मागणी आहे. पण दीड महिन्यापूर्वीच सरकारने ही मागणी का केली नाही? आज ही मागणी करून सरकारने दीड महिना वाया घालवला, असे संभाजीराजे म्हणाले.

चव्हाणांनी आरक्षणाचा घोळ घातला : संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर समाज प्रचंड नाराज झाला आहे. अशोक चव्हाणांनी आरक्षणाचा घोळ घातल्याची भावना आहे. पण मी चव्हाणांची सातत्याने पाठराखण केली. तरुणांना समजावले त्यामुळे समाज शांत आहे. पण समाज शांत असला तरी चव्हाणांवरील त्यांचा संताप गेलेला नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.