मुंबई: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या दरम्यान ते दौरा करणार आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला पवारांच्या बालेकिल्ल्यातून प्रारंभ होणार आहे.
फडणवीस 19 ऑक्टोबरला बारामतीमधून दौऱ्याला सुरूवात करणार आहे. त्यानतंर फडणवीस कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा या परिसराचा दौरा करत उस्मानाबादकडे रवाना होणार आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 20 तारखेला देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तर शेवटच्या दिवशी ते 21 हिंगोली, जालना आणि औरंगाबादचा दौरा करतील.