कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची खिल्ली उडवत टीका केली आहे. ते भाषण दसऱ्याचे नाही तर शिमग्याचे होते, असे म्हणून त्यांनी घणाघात केला.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखली नाही. जनतेशी संबंधित कुठलेही मुद्दे त्यांनी यावेळी मांडले नाही. हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं? काय ही भाषा. जरा तुमच्या भाषेचा विचार करा. हम किसी को टोकेंगे नही, कोई टोकेगा तो छोडेंगे नही. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतंय हे जनतेला माहीत आहे. आम्ही काय आहोत हे तुम्हाला निवडणुकीतच दाखवून देऊ' असा इशाराही दिला.

सरकारच्या वकिलांमध्ये एकमत नाही. आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, सरकारला आरक्षण देण्यात रस नाही हे आज दिसून आले. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही? हे त्यांनी स्पष्ट करावे. दसरा मेळाव्यात बांधील आहोत म्हटल्यावर विषय संपत नाही. सरकारने हे खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला आहे. वकिलांशी चर्चा केली पाहिजे ती होत नाहीये. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्यायाचा की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा घ्यायाचा हा विषय आता नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची आग्रही भूमिका आहे, असेही ते म्हणाले.