अमरावती : नवीन तीन कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी दिल्लीत दाखल होऊन चार दिवस उलटले असले तरी केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे, राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आता केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या 3 डिसेंबरपर्यंत मंजूर केल्या नाही, तर शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून दिल्लीत धडक देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिली आहे.
बच्चू कडू एका वृत्तवानीशी बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यावर तोडगा काढा. 3 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास आम्ही हजारो शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून बैतूलमार्गे दिल्लीला धडक देऊ. मी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. यवतमाळ येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 टक्के नफा देऊन हमी भाव देतो, असे वचनच मोदींनी शेतकऱ्यांना दिले होते. त्यांनी त्या वजनाचे पालन करावे, असे बच्चू कडू म्हणाले आहे.