औरंगाबाद/प्रतिनिधी,


मंदिरे उघडणार असल्याने आता न्यायमंदिरेही उघडुन ती पूर्ण क्षमतेने सुरु करावीत. तसेच प्रत्यक्ष सुनावणीला सुरवात करावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी दि.7 सकाळी 11 वाजता जिल्हा न्यायालयाच्या समोर वकीलांनी निदर्शने केली.
कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व न्यायालये बंद आहेत. अति महत्वाचे प्रकरणांमध्येच काही प्रमाणात काम सुरु आहे. न्यायालयात कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु होत नसल्याने ज्युनिअर वकील व त्यांच्या कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनानंतर सर्व व्यवहार पुर्ववत होत आहेत. मंदिरे उघडणार असल्याने आता न्यायमंदीरेही उघडावेत या मागणीसाठी अ‍ॅड. राकेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा न्यायालयासमोर अदालत रोडवर निदर्शने करण्यात आले. वकिलांनी वकील परिषदेकडे नोंदणी केल्यानंतर त्यांना अन्य व्यावसाय करता येत नाही. परिणामी उपासमारीमुळे वकिलांवर आत्महात्या करण्याची वेळ आली आहे. चार दिवसापूर्वी नांदेडमध्ये वकिलाने आत्महत्या केली आहे. प्रत्यक्ष न्यायालयात वकील आणि साक्षीदारांनाच प्रवेश देवून नियमांचे पालन करत न्यायालये सरु करावेत अशी मागणी अ‍ॅड. कुलकर्णी यांनी यावेळी केली. या आंदोलनात रुतूजा कुलकर्णी, संदीप देगावकर, सतिष चव्हाण, प्रशांत यादव, सचिन थोरात, अनिल बारसे, संदीप राजेभोसले, पद्मिनी मोदी, सुश्मिता दौड यांच्यासह वकीलांची उपस्थिती होती.


अशा आहेत मागण्या
न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरु करावे, जोपर्यंत कामकाज सुरु होत नाही तोपर्यंत राज्य शासन व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल व बार कौन्सिल तर्फे ज्युनिअर वकिलांना प्रतिमहा दहा हजार रुपये महिना द्यावा. प्रलंबित प्रकरणात युक्तिवाद तसेच साक्षीपुरावे नोंदविण्याचे कामकाज सुरु करावे. वकिली व्यावसाय अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करावा, आत्महत्या केलेल्या वकिलांच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या.