मुंबई - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र हे संवाद आहे, कुठलेही दबावतंत्राचा भाग नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेत्यांनी केला आहे. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार हे गॅसवर असल्याचे भाष्य भाजपच आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.

आशिष शेलार यांनी सोनिया गांधी यांच्या पत्रावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वंचितांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. केंद्र सरकारच्या या योजनांचा फायदा राज्य सरकार जनतेला देत नाही, अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार गॅसवर आले असून सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:चा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही शेलारांनी केला आहे.

कांजूर मेट्रोशेडवरून ठाकरे सरकारवर साधला निशाणा...
विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागताय?, का महाराष्ट्रद्रोह करताय?, असा सवाल अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

'आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर घालवणार ? का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय? तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजना नुसार बीकेसील भूखंडावर भूभागात बुलेट ट्रेनचे स्टेशन तर पृष्ठभागावर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र. बुलेट ट्रेन नकोच म्हणताय, मेट्रो होऊच नये अशी व्यवस्था करताय, आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय...? मुंबईकर हो! ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा...मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!" अशी टीका शेलारांनी आपल्या टि्वटमधून केली आहे.