मुंबई पोलीस लवकरच बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला चौकशीसाठी नोटिस पाठवणार आहे. अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. तिने याबाबत तक्रारही दाखल केली आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या अटकेच्या मागणीसाठी पायल घोषणने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पायलने सांगितले, की राज्यपालांनी आम्हाला म्हणाले, या लढ्यात ते माझ्याबरोबर आहेत. मी त्यांच्याकडे माझ्या संरक्षणाची मागणी केली. तसेच या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहनही केले. अनुराग कश्यपला तातडीने अटक करण्याचीही मागणी केली.

यावेळी तिच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेदेखील होते. तिला पाठिंबा देण्यासाठी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले मैदानात उतरले आहेत. रामदास आठवले यांनी अनुराग कश्यपवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी मागणी मुंबई पोलीसांकडे केली आहे.

अभिनेत्री पायलने मागील आठवड्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. तिने आपल्या तक्रारीत गैरवर्तणूक, छेडछाड, तुच्छ वागणूक असे आरोप लावले आहेत. पायलच्या तक्रारीनुसार, अनुराग कश्यपने 2014 मध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. परंतु अनुरागने हे सर्व आरोप फेटाळले असून हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे स्पष्ट केले.