मुंबई - बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली होती. आपल्याला न्याय मिळावा आणि अनुरागवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पायल घोषने अनेक आरोप लावून गुन्हा दाखल केला होता. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुनही अनुरागला चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. त्यावेळी तिने आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा पाठिंबा मिळवला होता. पायल घोष आणि रामदास आठवले यांनी अनुरागची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती.

आता विशेष म्हणजे, पायलने हे प्रकरण बाजूला सारत, आरपीआयचा झेंडा हाती घेतला आहे. तिने आता मनोरंजन क्षेत्रानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अभिनेत्री पायल घोषकडे रिपाईच्या महिला मोर्चाचे उपाध्यक्ष पद सोपावलं जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पायलच्या पक्षप्रवेशावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले, 'कायद्यानुसार पायलवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही पायल घोषसोबत आहोत. याप्रकरणी मला पश्चिम बंगालमधूनही फोन आले होते. पायल पश्चिम बंगालची आहे. तुम्ही मुंबईत राहता, तुम्ही पायलला पाठिंबा द्या, असे मला सांगण्यात आले. मी सांगितले त्यांना की, मला हे सगळे सांगण्याची गरज नाही. मला सगळे माहिती आहे. त्यामुळे या अभिनेत्रीला पाठिंबा देण्याची आमची जबाबदारी होती. त्यामुळेच आम्ही पायल घोषला पाठिंबा दिला. ज्यांनी अनुराग कश्यपला केले आहे घायल, तिचे नाव आहे पायल,' असे म्हणत आपल्या खास कवी शैलीत रामदास आठवले यांनी पायल घोषचे पक्षात स्वागत केले.