मुंबई - भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आज ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, परंतु राष्ट्रवादी त्यांना कोणते पद देणार याची चर्चा चांगलीच रंगली. त्यांना कोणते पद दिले जाईल, याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड आपले मंत्रिपद सोडायला तयार नाहीत आणि शिवसेनादेखील खडसेंसाठी कृषीमंत्री पदाचा त्याग करण्यास नकार देत आहे. अशात महाविकास आघाडीतील धूसफूस समोर येत आहे. शिवसेना आणि एकनाथ खडसे यांता वादही सर्वांना ठावूक आहे. त्यामुळे शिवसेना आपली नाराजी दूर ठेवत खडसेंना पद देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, दादा भुसे खडसेंसाठी कृषीमंत्रीपद देण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. यावर पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे दादा भुसे म्हणाले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील ते महत्वाचे ठरेल.
सध्या जर मंत्रीपद देणे शक्य नसेल तर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद खडसेंना दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पद देवून एकनाथ खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होवू शकतो.