मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौत्के चक्रीवादळाने रौद्रवतार धारण केला आगहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागोमाग एक असे तीन ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा सवाल केला आहे.
“मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी…त्यातच कोरोनाचे संकट आणि मुख्यमंत्री घरात बसलेत.” असे केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे.
तसेच, “अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली, करतात पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा देखील सवाल उपाध्ये यांनी विचारलाय.
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतके मनावर घेतले आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुद्धा आहे हे कधी लक्षात येणार?” असेही केशव उपाध्ये यांनी टि्वटमध्ये म्हटलेय.
“महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळवला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे.” असा टोला देखील उपाध्येंनी लगावला.