मुंबई - मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध कंगणा रानौत आणि अर्णब गोस्वामी असा वाद रंगत आहे. या दोन्ही प्रकरणात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत फटकारले आहे. या मुद्द्यावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले असून देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

'कंगणा रानौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही, परंतु त्याहीपेक्षा सरकारविरोधी विचार मांडणाऱ्यांना चिरडून टाकू या ठाकरे सरकारच्या विचारांशी तर आम्ही अजिबात सहमत नाही. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला चपराक लगावल्यानंतर आता तरी हे सरकार सुधारणार आहे का? आता या न्यायालयांनाच तुम्ही महाराष्ट्रविरोधी ठरवणार आहात? हे प्रश्न आता विचारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या दोन न्यायालयांना सरकारने महाराष्ट्रविरोधी ठरवले नाही तरी खूप झाले.' असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

'अर्णब यांनी सरकारी यंत्रणेसाठी अडचणीची ठरणारी मते थेट टीव्हीवर नोंदवल्यानेच त्यांना या सरकारने लक्ष्य केले. कायदा कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी वापरायचा नसतो न्यायलायने असे निरिक्षण नोंदवले आहे. कंगणा राणौत प्रकरणातही मुंबई पालिका आणि राज्य सरकारला न्यायलायने झापले आहे. कंगणाच्या कार्यालयावर केलेली पाडकामाची कारवाई अवैध होती. त्यामागचा हेतु चांगला नव्हता असेही न्यायालयाने म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणात सरकारी तंत्राचा गैरवापर करण्यात आला' अशी देखील टीका फडणवीसांनी केली.