सातारा - 'शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष कधीच एकत्र नव्हते. फक्त सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहेत. वेगवेगळ्या विचारांचे हे पक्ष एकत्र आले होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी ताकदीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे आपले स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर ते एकत्र राहणार नाहीत', अशी टीका उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर केली. सातारा येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आलेल्या उदयनराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

'केवळ सत्ता हस्तगत करणे हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरिता अमिष दाखवले जाते. मात्र ते कधीच एकत्र राहत नाहीत. त्यांचा उद्देश सार्थक झाला तर ते सर्व निघून जातात. याला फक्त भाजप अपवाद आहे. भाजप विचाराने एकत्र आहे. त्यांना कोणत्याही ताकदीचा वापर करावा लागत नाही. त्यांचे उद्दिष्टे निश्चित असून त्यामुळेच ते एकसंघ आहेत,' असेही उदयनराजे म्हणाले सांगितले.

'ठाकरे सरकारमध्ये एक वाक्यता नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे, ते कसे येणार आहे, ते विचारू नका' असे भाकीत पुन्हा एकदा उदयनराजे यांनी वर्तवले आहे.

भाजप राज्यातील सर्वच्या सर्व सहा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये एकोपा आहे. टीमवर्क आहे. त्याचे फळ निश्चितच मिळेल, असेही ते म्हणाले.