मुंबई - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल केला जातोय. दरम्यान भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागे झाल्याचे दिसते आहे. कारण, आता राज्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. 

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या बाळांच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनीटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत,' अशी माहिती अजित पवारांनी दिलीये.

'भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बातचीत करून संपूर्ण दुर्घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत,' अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.

रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच सायंकाळी 5 वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत 3 चिमुकल्यांचा होरपळून तर 7 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.