मुंबई - दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टींनी याबाबत माहिती दिली. आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. तसेच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्यांच्या निषेधार्थ २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढला जाणार आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत आहेत, जवळपास ३० शेतकर्‍यांचा मृत्यू झालाय. त्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी सायंकाळी प्रत्येक गावागावात मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यावेळी आंदोलन यशस्वी करण्याची शपथ घेतली जाणार आहे. सरकार मागे हटणार नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही. सरकारला हे आंदोलन दडपायचे आहे. शेतकऱ्यांना लुटून खायचे धोरण या सरकारचे आहे. यात जे शेतकरी हुतात्मा झालेत, त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही.

पुढे ते म्हणाले की, त्याच्याच पुढच्या टप्प्यात २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर मोर्चा काढला जाईल. ज्या अंबानी आणि अदानींसाठी कृषी विधेयक आणले आहे, त्या दोघांमधील अंबानीचा जगात पहिल्या ५ श्रीमंतांच्या यादी सामावेश आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला एकच विचारायचे आहे की बाबा तुझी नेमकी भूक तरी किती आहे. हे एकदाचे सांगून तरी टाक हे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विचारणार आहोत.

प्रकाश आंबेडकरांनी देखील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. ते आंदोलन करणार आहेत. त्यावर शेट्टी म्हणाले, आपले जे काही वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. पण आपल्या शेतकर्‍यांसाठी सर्वांनी एकत्र यावे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. त्यांचे स्वागत आहे.