मुंबई - धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा या तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर अजून एक गंभीर आरोप केला जात आहे. धनंजय मुंडेंनी 2019 च्या निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या पत्नी आणि मुलांचा उल्लेख केलेला नाही, असाही आरोप होत आहे. त्यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दिली आहे. भाजप नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

'काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करु नये, एखादा दगड तुमच्या घरावर बसला तर तुमचाही महाल कोसळून पडेल. विरोधी पक्षाने भान ठेवले पाहिजे. त्यांनीसुद्धा संयम ठेवला पाहिजे. आपण सुद्धा कधीकाळी सत्तेवर होता. आपण सुद्धा राजकारणामध्ये आहात. हमाम में सब नंगे है, याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे. आम्ही नितीमत्ता सांभाळतो, आम्ही संयम पाळतो, नितीमत्ता आम्हाला कुणी शिकवू नये. पण नितीमत्ता तुम्ही किती पाळता याचा हिशोब करायला कुणी खाते-वही घेऊन बसले, तर त्रास होईल, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजप नेत्यांना इशारा दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात लग्नासंदर्भातील माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या आरोपाच्या संदर्भाने संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट...
संजय राऊत यांनी सपत्नीक शरद पवार यांची सिल्वर ओके येथे भेट घेतली. राऊत यांच्या सिल्वर ओकवरील सहकुटुंब भेटीची जोरदार चर्चा रंगली होती. परंतु या भेटीमागचे कारण समोर आले आहे. संजय राऊत यांच्या मुलीचा लवकरच साखरपुडा होणार आहे. आपल्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या भेट घेण्यासाठी गेले होते. 

संजय राऊत यांची मुलगी पूर्वशीचे मल्हाप नार्वेकर यांच्याशी लग्न ठरले आहे. मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव आहेत. येत्या 31 जानेवारीला पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा होणार आहे.