मुंबई - राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना 'बेबी पेंग्विन' म्हणणाऱ्या समित ठक्करला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी समित ठक्कर हा नागपूरचा रहिवासी असून त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली होती.

समितला राजकोट येथून अटक केली असून आज नागपूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी जुलै महिन्यात समित ठक्कर विरोधात तक्रार दिली होती. समित ठक्कर हा नेहमीच टि्वटरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह टि्वट करत असतो. तसेच तो धार्मिक भावना दुखावल्या जातील असेही टि्वट करतो, असे शिवसैनिकांनी तक्रारीत म्हटले होत . त्यानंतर पोलिसांनी समित ठक्कर विरोधात गुन्हा नोंदवला होता. समितचे टि्वटर ६० हजारांच्या घरात फोलोअर्स आहेत. भाजपचे अनेक मात्तबर नेतेही समितला टि्वटरवर फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सामावेश आहे. त्यामुळे भाजपच्या गोटीत त्यांचा चांगलाच प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.

समितवर तक्रार दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील त्याची पाठराखण केली होती. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्करच्या विरोधात तक्रार दिली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा धर्मेंद्र मिश्रा यांनी केलाय.

धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 1 ऑक्टोबर 2020 रोजी हायकोर्टाने समितला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर समित 5 ऑक्टोबर रोजी व्ही. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर दाखल झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो, असे सांगून तिथून पळ काढला.