औरंगाबाद : आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली औरंगाबाद येथे बोलाताना केली आहे. ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य असल्याचे ही त्या म्हणाल्या. जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी, तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या आहेत. 

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी बोलण्याचे टाळले होते. मात्र आज पंकजा यांनी आपली भूमिका मांडली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विकदृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो, नाते म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी राजकीय भांडवल केले नसते आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच.'