पुणे - ऊसतोड कामगारांच्या करार नुतणीकरणाची मंगळवारी (दि.२७) पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक सुरू झालीये. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडेंसह अनेक नेते उपस्थित आहेत. परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या संघटनेलाही प्रवेश नाकारला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बाहेर गोंधळ घातला आहे.

या बैठकीला भाजप नेते सुरेश धस यांना येता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्या निर्णयामुळे धस आक्रमक झाले होते. त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनानंतर त्यांना बैठकीसाठी आत बोलवण्यात आले. 'ज्यांनी मला बैठकीसाठी येऊ दिले नाही. तसेच आमच्या जिल्ह्यातील काही लोक आतमध्ये आहेत. त्यांना जाऊन विचारा,' अशी भूमिका मांडून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावला.

यावेळी सुरेश धस म्हणाले की, 'ऊस तोड मजुराच्या प्रश्नावर आजवर अनेक वेळा बैठकीला उपस्थित राहिला आहे. मात्र यंदा का येऊ दिले नाही, हे समजण्यास मार्ग नाही. राज्यात 13 लाख ऊस तोड कामगार आहेत. त्या सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी आलो होतो. मात्र काही तास अगोदर सांगितले जाते की, तुम्हाला बैठकीला येत येणार नाही. यातून एकच स्पष्ट होते. बैठकीला न बोलवून दडपशाही आणि मुस्कटदाबीचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. आतमध्ये केवळ म, म म्हणणारेच लोकं पाहिजे आहेत. असेच लोक आतमध्ये बसवले आहेत' अशा शब्दांत बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आम्हाला हा लवादा मान्यच नाही....
पाच संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पत्र लिहून, आम्ही ज्या मागण्या समोर केल्या आहेत त्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत ऊसतोड कामगारांचा संप सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे. सदरचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासोबत चर्चा करा, असेही या पाच संघटनांनी साखर संघाला ठणकावून सांगितल्यामुळे ऊसतोड कामगारांचा संप अधिक चिघळण्यात येत असल्याचे दिसून येते. सध्याच्या लवादात कारखानदारांचे प्रतिनिधी असून ते मजुरांची नव्हे तर कारखानदारांची बाजू घेणारे आहेत त्यामुळे हा लवादच आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले. रात्रंदिवस ऊसतोड कामगार काबाड कष्ट करतात मात्र त्या तुलनेत त्याचा मोबदला मिळत नाही म्हणून ऊसतोड कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. आतापर्यंत साखर संघासोबत ऊसतोड कामगारांच्या चार बैठका झाल्या मात्र एकाही बैठकीत ठोस निर्णय झाला नाही.

आता ऊसतोड कामगारांच्या पाच संगटनांनी सरकारला थेट पत्र देऊन आम्हाला पंकजा मुंडे, जयंत पाटील यांचा लवाद मान्य नाही, पूर्वी जे सरकारचे प्रतिनिधी होते ते कारखानदारांचे नव्हे तर ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधीत्व करत होते मात्र गेल्या काही वर्षांपासून सरकारचे प्रतिनिधी असलेले साखर कारखानदारांचे काम करतात. त्यामुळे ते ऊसतोड मजुरांची नव्हे तर साखर संघांचीच बाजू घेणार आहेत.