मुंबई : कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोविन अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चे अ‍ॅप्लिकेशन वापरु द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. 

हे पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. यावेळी स्वतंत्र अ‍ॅपच्या वापराविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. तसेच, देशातील या संपूर्ण परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहे. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान मोदींनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधून कोरोना स्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आहे. 

आगामी तीन दिवसांत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 53 लाख लसींचा साठा मिळणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. शिवाय, गेल्या 7 दिवसांत देशातील 180 जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. तर 18 जिल्हे असे आहेत जिथे गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. तर 54 जिल्ह्यांत गेल्या 21 दिवसांत कोणताही नवा रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.