मुंबई - केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात नितीन गडकरी चांगलेच संतापले होते. इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबामुळे गडकरींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना चांगलेच झापले.

यावेळी गडकरी म्हणाले, 'अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर अभिनंदन केले जाते. परंतु मला आश्चर्य वाटतेय की, तुमचे अभिनंदन कसे करू? कारण २००८मध्ये अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल असे निश्चित झाले होत. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे अडीचशे कोटींचे काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झाले. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारे आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झाले आहे. ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केले आहे, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,' असा टोमणा गडकरींनी अधिकाऱ्यांना मारला.

'८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग ३ वर्षांत पूर्ण करणार असल्याचे आपण अभिमानाने सांगत आहोत. इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या कामाला ३ ते साडेतीन वर्ष लागणार असतील आणि या दोनशे कोटींच्या कामासाठी आपण १० वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखे नाही. पण मला याची लाज वाटतेय. जे विकृत विचारांचे लोक आहेत. ज्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या. हे सगळे १२ ते १३ वर्षांपासून चिटकून बसले आहेत. जो कुणी नवीन अध्यक्ष येतो, त्यांचे मार्गदर्शक हे लोक बनतात. जे पूर्णपणे नकारात्मक आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही, पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. अशा विकृत लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारले जाते, हे मला कळत नाही. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचे उदाहरण म्हणजे ही इमारत आहे. हे काम ज्यांनी पाहिले, त्याचा एक संशोधन पेपर तयार करावा. या संस्थेचे इतके नाव आहे, त्यानंतरही आपण अपयशी ठरलेलो आहोत,' असे गडकरींनी म्हणाले.

'माझे नाव बदनाम झालेच आहे. मला रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावले, सेवामुक्त केले, हेच माझे उद्दिष्ट आहे. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचे वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हे काम पूर्ण झाले बघण्यासाठी तीन सरकारे बदलून गेली. मग मी तुमचं काय अभिनंदन करू. मला अभिनंदन करायचीही लाज वाटतेय.' अशा कठोर शब्दांत गडकरींना अधिकाऱ्यांना सुनावले.