मुंबई - खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आज सकाळी संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी राज्यपालांवर निशाणा साधत टीका केली.

संजय राऊत म्हणाले, 'विधान परिषदेच्या 12 जागा तुम्ही कशा रिकाम्या ठेवू शकता? आज 10 महिने होत आलेत, घटनात्मक पदावर बसून तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का? तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो? की, जोपर्यंत हे सरकार पाडले जात नाही आणि माझ्या मनासारखे सरकार येत नाही. तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त केलेल्या शिफारसी आहेत, त्यावर सही करणार नाही, असा आदेश राज्यपालांना आला आहे का? हे राज्यपालांनी स्पष्ट करायला हवे. पण 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणे हा विधिमंडळाचा अपमान आहे. आणि हा महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा अपमान आहे.'

भाजपच्या नेत्यांना बोलताना राऊत म्हणाले, "भारतीय जनता पक्षाला जर याविषयी काही वाटत असेल, आणि जर ते महाराष्ट्राचे काही देणेघेणे लागत असतील, तसेच त्यांच्या घटनेशी काही संबंध असेल, तर त्यांनी राज्यपालांना जाऊ सांगायला हवे. राजकीय मतभेद, राजकीय लढाया आम्ही लढू. पण तुम्ही घटनेचा खून करु नका."