पुणे - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना फोन करून एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत धाव घेतली असून धमकी देणारी व्यक्ती साताऱ्यातील आहे. रुपाली पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरल्या असून मनसेकडून निवडणूक लढवत आहेत.

आरोपींने फोन करून 'तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,' अशी धमकी दिली, असे रुपाली पाटील यांनी पोलिसांना तक्रार देताना सांगितले.

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात रुपाली पाटील यादेखील सातारा, कोल्हापूर भागांना भेटी देऊन पदवीधरांशी संवाद साधून प्रचार करत आहेत. दरम्यान, पाटील यांना फोन करुन एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. धमकी देणाऱ्याला अटक करण्याची आणि आपणाला पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील सातारा दौऱ्यावर आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड, तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.