मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी (दि.3) मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेंविरोधात तक्रार केली आहे. 

या तक्रारीनुसार, मागील 3 महिन्यांपासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. यात 14 वर्षांच्या मुलीचाही सामावेश आहे, ती सूरक्षित नसल्याचे यात म्हटले आहे. पोलिसांनी सहकार्य केले नाही तर 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 

करुणा यांनी पोलील आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत माझे पती धनंजय मुंडे यांनी मागील तीन महिन्यांपासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवले आहे. मला त्यांच्याशी भेटू दिले जात नाही. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर गेल्यानंतर मुंडेंनी 30 ते 40 पोलीस बोलावून मला हाकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाहीत. यात माझ्या 14 वर्षांच्या मुलीचाही सामावेश असून तिच्यासाठी केअरटेकरसुद्धा नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लिल वर्तन करतात. माझ्या मुलांचे काही बरेवाईट झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणला बसणार असून चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी देण्याची मागणी या तक्रारीत केली आहे. तसेच धनंजय मुंडेंवर कठोर कारवाई करण्याचीदेखील मागणी करुणा यांनी केली आहे.