बंगळुरु : कर्नाटकातील शिवमोगा येथे दगडखाणीजवळ भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात तब्बल 8 जणांचा मृत्यू झालाय. बंगळुरुपासून सुमारे साडेतीनशे किमी अंतरावरील शिवमोगा येथे गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. ट्रकमधून जिलेटिन कांड्या आणि स्फोटके वाहून नेताना हा भीषण स्फोट झाला. ही स्फोटके खाणकामासाठी नेली जात होती.  

हा स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या परिसरात भूकंपासारखे धक्के जाणवले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने भूगर्भ तज्ज्ञांना याबाबत माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी हा भूकंप नसून हंसूर परिसरात स्फोटकांचा ब्लास्ट झाल्याचे सांगितले. 

दरम्यान, या स्फोटातील सर्व मृत व्यक्ती बिहारचे रहिवाशी होते. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर अफवांचा सुळसुळाट : या स्फोटानंतर सोशल मीडियावर अफवांचा सुळसुळाट सुरु झाला. या मेसेजमधून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शिवमोगाचे जिल्हाधिकारी शिवकुमार यांच्या सांगण्यानुसार, हुनासोडू गावाजवळ रेल्वे क्रशर साईटवर जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवमोगा शहरापासून 5-6 किमी अंतरावर हा स्फोट झाला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला.