कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावे लागेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलेय. 

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबतही भाष्य केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा 
आरक्षणाच्या विषयावर बोलले पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावे. गायकवाड आयोगाने ज्या निष्ठेने काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना, तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे सांभाळून बोला, असा सूचक इशारा दिला होता. यावर हसन मुश्रीफ यांनी आक्षेप नोंदवला होता. लोकशाहीमध्ये अशाप्रकारे धमकावणे योग्य नाही. गेल्यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केला होता. त्यामुळे आता मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.