ठाणे : मुस्लीम आणि दलितांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून गायब करण्यात येत आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय क्षेञात खळबळ उडाली आहे. तसेच मतदार याद्या आधार कार्डशी जोडण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
पुढील वर्षी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येणार आहे. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून कपात करण्यात  आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. महानगर पालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात करण्यात आला आहे. मुंब्रा येथे 20 ते 30 हजार मतदारांची नावे काढून टाकण्यात आले आहे. त्यासाठी स्थलांतरण असा शेरा मारण्यात येत असला तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. ही नावे गाळण्यामागे जबाबदार कोण आहे. याचा विचार केल्यास ही जिल्हाधिकार्‍यांची जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात येत असते. म्हणून आमची मागणी आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करण्यात यावी. जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहेत. ते स्थलांतरण रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी मंञी आव्हाड यांनी केली आहे.