पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार भालके यांचे सोलापूर जिल्ह्यातील मूळगाव सरकोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार भालकेंचा मुलगा भागीरथी भालके यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

आमदार भारत भालके यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

भारत भालके यांचे पार्थिव सकाळी पुण्यावरुन पंढरपूरकडे रवाना झाले. पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर पार्थिव भालके यांच्या मूळगाव सरकोली इथे नेण्यात आले.

भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मध्यरात्री १२.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे.