मुंबई : सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.१७) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. “सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता. सचिन वाझे यांचा रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता.' असे फडणवीस म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले, “उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर ज्याप्रकारे जिलेटीन कांड्याने भरलेली एक स्कॉर्पिओ आढळून आली व त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. त्यानंतरच्या घटनांमधील सर्वात मोठी कडी मनसुख हिरेन यांची ज्याप्रकारे हत्या केली जाते. या सर्व गोष्टी मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडल्या नाहीत. आम्ही ९० च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरणाचा महाराष्ट्रात अनुभव घेतला होता. तशाच प्रकारची ही परिस्थिती आहे. आता तर संरक्षण करणारेच अशाप्रकारे गुन्हे करत असतील, तर मग संरक्षण कोण करणार हा प्रश्न आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांना हटवून सचिन वाझेंना क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. सीआयईचे प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून वाझे यांना नेमले. मी गृहमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत परत घेण्यास नकार दिला होता.  वाझे यांनी मनसुख हिरेन यांच्याकडून स्कॉर्पिओ खरेदी केली होती पण पैसे दिले नव्हते. हिरेन यांनी पैसे किंवा गाडी परत देण्यास सांगितले होते.” असेही फडणवीसांनी सांगितले.

“परमबीर सिंग व सचिन वाझे तर खूपच लहान नावे आहेत. यामागे कोण बड्या हस्ती आहेत, त्यांची नावे समोर यायला हवीत. सचिन वाझेंना वापरणारी माणसे सरकारमध्ये बसलेली आहेत, त्यांची चौकशी कोण करणार?” असा सवालही फडणवीसांनी यावेळी विचारला.