जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर पतसंस्थेत घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहेत. आताही जळगाव बी एच आर पतसंस्थेवर खडसेंच्या तक्रारीमुळे कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बी एच आर पतसंस्थेमध्ये भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत.

या तक्रारीमुळे एकनाथ खडसेंनकडून गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरेतर २०१८ पासून खडसेंनी दिल्लीकडे याबाबत तक्रार केली होती. एकनाथ खडसे आता महाविकास आघाडीत असल्याने त्यांनी केलेल्या अनेक तक्रारींची दखल घेतली जात आहे. खडसेंच्या पाठपुराव्यामुळे पतसंस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. इतकेच नाही तर चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेला गिरीश महाजन यांचे पत्रही सापडले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर आज ४ वाजता एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार आहे.

'या प्रकरणामध्ये जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. अशात जर काही माहिती दिली तर चौकशीमध्ये हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे लगेच नावे जाहीर करणे हे योग्य ठरणार नाही म्हणून एकदा का चौकशी पूर्ण झाली की संपूर्ण माहितीसह पत्रकार परिषद घेणार आहे', असेही खडसेंनी सांगितले होते.