नाशिक : राज्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे.कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याबाबत महामंडळाचा विचारविनिमय सुरू होता. अखेर आज नाशिक येथे होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने निवदेनाद्वारे याची माहिती दिली आहे.
नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आयोजन करण्यात आले होते. माञ, राज्यात वाढणाऱ्या कोरोनामुळे हे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याची माहिती दिली आहे. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते. पण, नोव्हेंबर २०२०च्या मध्यापासून कोरोना संक्रमण कमी झाले. डिसेंबरमध्ये आटोक्यात आले आणि महाराष्ट्राने कोरोनावर मात केली असे दिसून येत होते. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले होते, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

रसिक,लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून निर्णय : संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू असताना कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागत मंडळाने कोरोना कमी होण्याची वाट पाहिली. पण, तो कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. उलट प्रभाव वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिकमधून येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ठाले यांनी स्पष्ट केले आहे.