(संग्रहित फोटो)

अनेकांना आपण कपड्यांवर डाग पडल्याने अनेक आवडते कपडे कसे कपाटात पडून आहेत याविषयी बोलताना पाहतो. सुंदर कपडे, दागिने घालून आपण वावरताना जर कपड्यांवर डाग पडले तर आपला आवडता ड्रेस खराब झाला या भावनेतून आपण नाराज होतो. काही कपडे खूप महागडे असतात. अशावेळी आपले बरेच नुकसान होऊ शकते. हे नुकसान होऊ नये म्हणून या टिप्स वापरून कपड्यांवरचे डाग घालवू शकता.

                                                              (संग्रहित फोटो)

महिलांना त्यांच्या साडया अत्यंत प्रिय असतात. साड्यांवरचे डाग त्यांना सहन करू शकत नाहीत. प्रत्येक साडीमागे एक आठवण दडलेली असते. काम करताना साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे. फरक दिसून येईल.

                                                              (संग्रहित फोटो)

आपली मुलं शाळेत सायकलवर जातात. जाता येता कधीतरी मुलांच्या कपड्याला सायकलच्या चेनचे ऑइल लागते. हे निघणे कठीण असते. मुलांच्या शाळेचा गणवेश खराब होऊ नये म्हणून ते काढणे सुद्धा गरजेचे होते. सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात. त्याचा वापर करा आणि झटकन डाग घालवा.

      (संग्रहित फोटो)

गॅरेजवर काम करणारी किंवा शोरूम मध्ये असणाऱ्या व्यक्तींना ग्रीस किंवा वानिर्शच्या डागांची सवय असते. पण आपण कधीतरी तिथे गेलो तर ते डाग ऑफिसच्या कपड्यांना लागतात. असे ग्रीस किंवा वॉनिर्शचे डाग टर्पेन्टाईलने जातात. नक्की वापरून पहा.

                                                              (संग्रहित फोटो)

अनेकांना पान खायची सवय असते. अशा लोकांचे कपडे कायम पानाच्या पिचकारीने खराब होण्याची शक्यता असते. कपड्यावर पानाचे डाग पडले तर लगेचच लिंबू कापून डागावर घासावेत, स्वच्छ पाण्यात धुवावे. जर झटपट काही उपाययोजना करायची असेल तर, कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवावे. डाग निघण्यास मदत होते.

(संग्रहित फोटो)

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग पडतात. लिंबाच्या रसाने हे डाग घालविता येतात. लिंबाचा रस या डागांवर १० मिनिटे लावून ठेवावा मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत. कपड्यांवरचे हळदीचे डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा, किंवा कपडे धुण्याची कोरडी पावडर त्यावर लावून घासून काढा. चहा, कॉफीचा पडलेला डाग प्रथम स्वच्छ धुवून घ्यावा मग जेथे डाग पडला आहे त्या भागावर बोरॅक्स पावडरची पेस्ट लावावी.

                                                              (संग्रहित फोटो)

पावसाळ्यात चिखलाचा डाग सहज पडतो. तो डाग दूर करण्यासाठी सोपा उपाय आहे. चिखलाचा डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा. मग, डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावून थोड्या वेळाने डाग धुवावा. कधी शाईचा डाग पडला तरी तो आपण घालवू शकतो. शाईचा डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे आणि मग डाग धुवून टाकावा.