(संग्रहित फोटो)

लाईफ स्टाईल - सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्टय़ा तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणं गरजेचं आहे. सुक्या मेव्यामध्ये वापरला जाणारा पिस्ता सर्वानाच परिचित आहे. पिस्ता हे छोटय़ा आकाराचे चविष्ट व कठीण कवचाचे पौष्टिक फळ आहे.

त्याचे कवच टणक, परंतु द्वीदल असते. पिस्त्याच्या गरावर एक साल असते. त्याच्या आतील गराचा रंग हिरवट पिवळा असतो. पिस्त्याचे झाड आकाराने खूप मोठे व डौलदार असते. त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूंनी सारख्या असून पानांनी बहरलेल्या असतात. पिस्त्याची झाडे इराण, अफगाणिस्तान, फ्रान्स, अमेरिका, तुर्कस्तान या भागामध्ये जास्त आढळतात. पिस्त्याला संस्कृतमध्ये म्युकुलका किंवा निकोचक, हिंदीमध्ये पिस्ता, इंग्रजीमध्ये पिस्ताचिओनट व शास्त्रीय भाषेत पिस्तासिया व्हेरा या नावाने ओळखले जाते.

                                                               (संग्रहित फोटो)

औषधी गुणधर्म-
पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.

                                                               (संग्रहित फोटो)

उपयोग –
पिस्त्यामध्ये जीवनसत्त्वातील थायमिन, नायसिन, रिबोफ्लेविन, कॅरोटीन हे घटक असल्यामुळे मज्जा संस्थेच्या कार्यासाठी पिस्ता सेवन उत्तम ठरते. दुधामध्ये पिस्त्याची पूड टाकून प्यायल्यास मेंदूचे कार्य उत्तम प्रकारे चालते. थकवा, नराश्य ही लक्षणे जाणवत नाहीत.

स्मृतिभ्रंश, विस्मरण जाणवत असेल तर नियमितपणे ४ ते ५ पिस्ते दुधात टाकून खावेत. चांगले कोलेस्टेरॉल निर्माण होऊन हदयविकार टाळण्यासाठी नियमितपणे पिस्ता सेवन करावे. बदाम, पिस्ता, खडीसाखर दुधात घालून त्याची खीर बनवावी व ही खीर नियमितपणे रोज सकाळी सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. पिस्तामध्ये विपुल प्रमाणात लोह असल्याने त्याच्या सेवनाने रक्त वाढते. पिस्त्याची फुले ही श्वसननलिकेतील व फुप्फुसातील वाढलेला कफ दूर करतात म्हणून जुनाट खोकला, सर्दी, दमा यावर ही फुले गुणकारी ठरतात. मिठाईच्या शोभेसाठी व चव वाढविण्यासाठी पिस्त्याचा वापर करावा. घरगुती आइस्क्रीम, केक, बिस्कीट करताना सजावटीसाठी पिस्त्याचा वापर करावा. पिस्त्यामध्ये पौष्टिक घटक भरपूर असल्याने त्याच्या सेवनाने जंतूंविरुद्धची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे लहान मुलांना व रुग्णांना नियमितपणे दुधातून पिस्ते द्यावेत.

                                                               (संग्रहित फोटो)

सावधानता -
सहसा पिस्ते खारवून साठवण्याची पद्धत आहे. परंतु असे पिस्ते जास्त प्रमाणात खाणे आरोग्यास घातक आहे. अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यामुळे त्यात असणारे पौष्टिक व औषधी घटक काही प्रमाणात नाश पावतात. म्हणून त्याऐवजी न खारवलेले साधे पिस्तेही बाजारात मिळतात. त्यांचा वापर करावा. तेही नुसतेच खाल्ले तरी ते शक्तिदायक, आरोग्यपूर्ण, सकस असतात.