औरंगाबाद / प्रतिनिधी

  शहरानंतर कोरोनाचा ग्रामीण भागामध्येही शिरकाव वाढत आहे. आजवर करण्यात आलेल्या 48 हजार 562 कोरोना चाचण्यांपैकी 4,572 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या ऑनलाइन बैठकीत अधिकार्‍यांनी सांगितले.
  जिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि.2 ऑनलाइन पार पडली.ग्रामीण भागात जिल्हा परषद आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. औरंगाबाद तालुक्यामध्ये 17 हजार 881 रुग्णांची अ‍ॅन्टिजेन, आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये 166 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तालुक्यातील मोठ्या बाजारची ठिकाण असलेल्या लाडसावंगी, कचनेर, करमाड, गाढेजळगाव, पिंप्रीराजा, वरझडी, सावंगी, भालगाव या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. वैजापूर तालुक्यामध्ये 3 हजार 718 जणांची तपासणी करण्यात आली. यात 407 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 14 जणांचा मृत्यू झाला. गारज, लासूरगाव, महालगाव, बोरसर, लाडगाव, वीरगाव, लोणी, खंडाळा, मानूर या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. सिल्लोड तालुक्यामध्ये 3 हजार 426 जणांची तपासणी करण्यात आली, यामध्ये 405 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 18 जणांचा मृत्यू झाला. फुलंब्रीमध्ये 2 हजार 681 पैकी 237 पॉझिटिव्ह आढळून आले. 9 जणांचा मृत्यू झाला. 5 मोठ्या गावांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. सोयगाव तालुक्यामध्ये 1 हजार 303 टेस्ट, 203 पॉझिटिव्ह, 5 जणांचा मृत्यू झाला. पैठणमध्ये 5 हजार 584 जणांचा टेस्ट 775 पॉझिटिव्ह, कन्नडमध्ये 2 हजार 221 टेस्ट 558 पॉझिटिव्ह, 18 जणांचा मृत्यू झाला. खुलताबादमध्ये 1 हजार 546 टेस्ट 246 पॉझिटिव्ह, 5 मृत्यू. गंगापूर तालुक्यात 19 हजार 202 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1 हजार 575 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. 27 जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेचे डॉक्टर व कर्मचारी अतिशय चांगले काम करीत असल्याबद्दल आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी समाधान व्यक्त करीत सर्वांचे कौतुक केले. कोविड सेंटरवर येणार्‍या रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वैजापूर तालुक्यात पीएचसी मंजूर करा ; गलांडे..............

  एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी या मोठ्या गावामध्ये 3 हजार 046 टेस्ट घेण्यात आली. यात तब्बल 1 हजार 075 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. वाळूजमध्ये 2 हजार 314 टेस्ट कल्यानंतर 94 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. औद्योगिक वसाहतीजवळील पंढरपूर व वडगाव कोल्हाटी या दोन गावांमधील वाढीव संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी तसेच वैजापूर तालुक्यातील पारहाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, असा ठराव सभापती अविनाश गलांडे यांनी घेतला. गिरनेरा तांडा येथील उपकेंद्र इमारतीसाठी निधी मंजूर असून, जागा नसल्यामुळे इमारत बांधकाम करता येत नसल्यामुळे वडगाव खुर्द या ठिकाणी इमारत बांधकाम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.