श्रींच्या विसर्जनासाठी पोलिस यंत्रणा सज्ज
विसर्जन विहिरींवर गेल्यास गुन्हा नोंदवणार
औरंगाबाद / प्रतिनिधी
यंदा कोरोनाच्या संकटात श्रींच्या विसर्जनासाठी सार्वजनिक मिरवणुका, व्यक्तिगत विसर्जनाला मनाई केली आहे. तसे केल्यास गुन्हा दाखल केले जातील, असा इशारा पोलीस आयुक्तांनी आधीच दिला आहे. अशांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच महापालिकेने गणेश मुर्ती संकलनासाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे.
यंदा कोरोनामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली नाही. त्यामुळे पोलिसांवरील ताण काही अंशी कमी झाला आहे. मात्र विसर्जनावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. मंगळवारी विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांनी जमा होऊ नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. तर विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिका आणि पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पालिका प्रशासनाने मुर्ती संकलनासाठी ठिकठिकाणी सोय केली आहे. त्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे. पोलीस बंदोबस्तासाठी तीन उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, 32 पोलिस निरीक्षक, 71 सहायक पोलिस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, एक हजार 143 कर्मचारी, एक राज्य राखीव बलाची कंपनी, एक रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स तसेच साडेतीनशे होमगार्ड यांचा खडा पहारा शहरात असणार आहे.
* न.प. ग्राम पंचायत, पं. स. तीचा संकलनासाठी पुढाकार
जिल्ह्यातील गणेश विसर्जनासाठी नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या वाहनातून घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तींचे संकलन केले जाणार आहे. त्यानंतर गणेश मुर्तींचे विसर्जन केले जाईल. त्यासाठी जिल्ह्यात पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सात विभागीय पोलिस अधिकारी, 18 निरीक्षक, 36 सहायक पोलिस निरीक्षक, 66 उपनिरीक्षक, एक हजार 257 कर्मचारी, तीनशे होमगार्ड आणि एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.