औरंगाबाद, जालना, बीडमध्ये 97 टक्के पेरणी भिजपावसामुळे चिंता : पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव
औरंगाबाद / प्रतिनिधी
मराठवाड्यात जोरदार पावसांमुळे खरिपाची पिकांची परिस्थिती चांगली आहे. औरंगाबाद, जालना, बीडमध्ये एकूण 97 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. शेतकरी पिकांवर औषध फवारणीवर जोर देत असल्याचे चित्र आहे.
विभागात कपाशीचे सरासरी क्षेत्रापैकी 10 लाख 25 हजार 368 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात 1 लाख 4 हजार 561 हेक्टरवर बाजरी आहे. मकाचे क्षेत्र 2 लाख 16 हजार 992 हेक्टर असून, तुरीचे क्षेत्र 1 लाख 40 हजार 913 हेक्टर आहे. सोयाबीन 4 लाख 6 हजार 486 हेक्टर, भुईमूग 12 हजार 487 हेक्टर, मूग 56 हजार 354 हेक्टर तर उडिद 4 हजार 305 हेक्टर असे एकूण 20 लाख 29 हजार 936 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. उडिद व मूग पिकांची सध्या काढणी सुरू आहे. कापूस, मका व सोयाबीन या पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पिकांवर पाने खाणारी आळी, उंटअळी व चक्रीभुंगा या कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. मका पिकांवर लष्कळी अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत असून, मका पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम या अळीने होऊ शकतो, असे मत कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. कापूस पिकांवर रस शोषण करणारी कीड तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी झाल्याचे आढळून आले आहे. या कीड रोगांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी कृषी विभागाच्या सल्ल्याने विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.
* यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस
कृषी विभागाच्या सहायक संचालक कार्यालयांतर्गत येणार्‍या तीन जिल्ह्यात आतापर्यंत 690 मि. मी. पाऊस पडला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत आता पर्यंत 108.25 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 108.97 तर बीड मध्ये 102.91 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पिके जोमदार असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.