सध्या थंडी जास्त वाढू लागली आहे. आपल्याकडे ऋतुमान आणि आयुर्वेदानुसार आहाराला विशेष
महत्त्व दिले जाते. थंडीच्या दिवसांत आवळे खाल्ल्याने थंडीतील अनेक आजारांना तुम्ही दूर ठेवू शकता. तसेच सध्या बाजारातही या दिवसांत आवळा सहज उपलब्ध होऊ शकतो.


आवळ्यात भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडंटस् असतात. शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढून टाकण्यास आवळा मदत करतो. सकाळच्या वेळी आवळा खावा, असे सांगितले आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता याची मदत होते.
आवळ्यात सी जीवनसत्त्व, आयर्न आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ऋतुमानानुसार होणारे विकार म्हणजे सर्दी-खोकला यापासून दूर राहायला मदत होते. यातील जीवनसत्त्व सी शरीरातील पचनशक्ती वाढवते.  व्हायरल
इन्फेक्शन टाळण्यासाठी आवळा कँडी किंवा आवळा, गूळ आणि सैंधव मीठ यांचे मिश्रण तयार करून त्याचा आहारात समावेश करता येईल. त्वचा आणि केसांचे आरोग्य सुरक्षित राखण्याकरिता आवळा टॉनिकचे काम करते. केसांतील कोंडा, केसगळती अशा केसांच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. तसेच त्वचेकरिता आवळा एक उत्तम एंटी एजिंग फळ आहे.
दररोज सकाळी आवळ्याच्या रसात मध घालून प्यायल्याने त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते असे आयुर्वेदात सांगितले आहे. दोन चमचे मध आणि दोन चमचे आवळा पावडर असे मिश्रण दिवसातून तीन ते चार वेळा घेऊ शकता. केस, डोळे आणि त्वचेकरिता आवळ्याचा फायदा होतो.
आवळ्यामुळे आम्लपित्त आणि अ‍ॅसिडिटी कमी होते. आवळा चटणी, लोणचं, मोरावळा अशा अनेक पदार्थांद्वारे आवळ्याचे सेवन करता येते. मधुमेहिंकरिताही आवळा खाणे गुणकारी आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आवळा गुणकारी आहे.