उमेश जोशी / औरंगाबाद

मोडून पडला संसार, पण मोडू दिला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा ! कविवर्य कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या ओळी प्रत्यक्षात उतरल्या आहेत कन्नड शहरात. येथील एका घिसाडी (लोहार) कुटुंबाचे व्यवसायाचे सर्व साहित्य चोरट्याने चोरून नेले. आता जगावं कसं या विवंचनेने हतबल झालेल्या चव्हाण कुटुंबाने अखेरीस विषाची बाटली जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी लक्ष्मी प्रतिष्ठानने या कुटुंबाला नव्याने सर्व साहित्य देत त्यांना जगण्याचे बळ दिले आहे.
कन्नड शहरातील न्यायालयासमोर लोकमान्य टिळक पुतळ्यामागे असलेल्या रस्त्याच्या कडेला धगधगत्या भात्यासमोर, लोखंडी अवजारांवर छन्नी हातोड्याचे घाव घालून व्यवसाय करणारे चव्हाण दाम्पत्य आपले कुटुंब चालवतात. घरात 105 वर्षांचे वयोवृद्ध वडील, आई, अंध आत्या, पत्नी, मुले अशा कुटुंबाचे चरितार्थ छन्नी हातोड्याचे घाव घालत चालते. रोज काम केले तरच घरची चूल पेटते, अशी या कुटुंबाची हलाखीची अवस्था. स्वतः सुभाष चव्हाण, पत्नी मीराबाई अशिक्षित असूनही, स्वतः बनविलेल्या लोखंडी औजारांवर हॉलमार्क तयार करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मात्र या सुखी संसाराला नियतीची दृष्ट लागली. एका रात्री चोरटयांनी दुकानातील सर्व साहित्य चोरुन नेले. या घटनेने पायाखालची वाळू सरकलेल्या चव्हाण कुटुंबाला आपल्या घरातील सदस्यांचे पोट भरण्याचा मोठा प्रश्‍न उभा राहिला. त्यांनी रीतसर पोलिसात तक्रर नोंदविली. मात्र हातावर पोट असल्याने आता दुकान पुन्हा कसं उभारावं ही विवंचना समोर होती. कोणताही पर्याय समोर नसल्याने अखेरीस पत्नी मीराबाई यांनी विषाची बाटली जवळ करण्याचा प्रयत्न केला. सुभाष चव्हाण यांना याचा अंदाज येताच त्यांनी पत्नीला आत्महत्येपासून परावृत्त केले. निराश झालेल्या या कुटुंबाने ओळख असलेले चित्रकार राजानंद सुरडकर यांच्याकडे आपली करून कहाणी सांगितली. सुरडकर यांनी त्यांच्या परिचयाचे निर्मल प्रतिष्ठानचे सचिव मिलिंद पाटील यांना हा प्रकार कळविला. सामाजिक कार्यात रुची असलेले मिलिंद पाटील यांनी या कुटुंबाला सहकार्य करण्याचे ठरवत तात्काळ ऐरण, भाता, ऐकूलाई, छन्नी, हातोडे, घण पोघर, चाफण असे आवश्यक साहित्य खरेदी करून दिले. विष घेत जीवन संपविण्याचा निर्णय घेतलेल्या चव्हाण कुटुंबाला मिलिंद पाटील यांच्या रूपाने देवदूत भेटल्याचा अनुभव आला, अशी भावना व्यक्त करत कुटुंबाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

अन् पुन्हा उभा राहिला संसार

सर्व साहित्य दिल्यानंतर दुकान नव्याने उभारलेे. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानचे सचिव इंजि. मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक रामेश्‍वर रेंगे यांच्या हस्ते 27 ऑगस्ट रोजी दुकानाचे नव्याने उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. आण्णा शिंदे, नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती कविता रत्नाकर पंडित, पंचायत समितीच्या उपसभापती डॉ. नयना काकासाहेब तायडे, डॉ. रविराज जाधव, सुनील पवार, डॉ. सदाशिव पाटील, अनिल सिरसाट, शिवाजी बोलधने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश बोलधने, डॉ. मुकुंद सोमवंशी, विकास राजपूत, जितेंद्र नरवडे, नगरसेवक बाबा शेख, युवराज बनकर, गोकुळ राजपूत, राजानंद सुरडकर, शिवसेनेचे सुनील पवार आदींची उपस्थिती होती.


गरीब कुटुंबांना सहकार्य गरजेचे

समाजात अनेक गरीब कुटुंब इमानदारीने काबाडकष्ट करून आपले चरितार्थ चालवत असतात. अशात त्यांच्यावर संकट कोसळले तर ते एकाकी पडतात. अशावेळी त्यांना आधाराची गरज असते. तो आपण द्यायला हवा. चव्हाण कुटुंब हे आत्महत्येचा विचार करत होते. मात्र ऐनवेळी आम्हाला हे माहित होताच त्यांना सावरण्यासाठी बळ दिले. प्रत्येकानेच गोरगरीब घटकाला सहकार्य करायला हवे.
-इंजि. मिलिंद पाटील, सचिव, लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान.