औरंगाबाद / प्रतिनिधी
सरपंच ते खासदार असा प्रेरणादायी प्रवास असलेले माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील. त्यांच्या जाण्यामुळे वैजापुर तालुक्यातील एक अभ्यासू नेतृत्व हरवले आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील मुरब्बी नेतृत्व म्हणून रामकृष्ण बाबा पाटील यांची ओळख होती. बुधवारी दि.2 सकाळी 6.30 वाजता त्यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवाव सायंकाळी वैजापुर येथील दहेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे त्यांचा आज जन्मदिन होता. त्यांच्या पश्चात अप्पासाहेब पाटील, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील ही दोन मुले, सून तथा जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, दोन मली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे 1970 साली सरपंचपदापासून आपल्या राजकारणाला त्यांनी सुरूवात केली. मात्र खर्या अर्थाने रामकृष्ण बाबा यांच्या कारकिर्दीला बहर आला तो 1985 साली, ते वैजापूरचे आमदार झाले. 1995 पर्यंत ते आमदार होते. त्यानंतर 1999 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर ते खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा पराभव करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. रामकृष्ण बाबांनी 25 वर्ष जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉप-आप बँकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही काम पाहिले.
सर्वमान्य नेतृत्व हरपले : अशोक चव्हाण..........
रामकृष्ण बाबा पाटील एक अतिशय लोकप्रिय व समाजाच्या सर्वच घटकांमध्ये स्वीकारार्हता असलेले नेते होते. सरपंच पदापासून आमदार व खासदारकीपर्यंतच्या प्रवासातून त्यांची कर्तबगारी व लोकप्रियता स्पष्ट होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच रूपात काँग्रेसला दीर्घकाळानंतर यश मिळाले होते. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक अनुभवी मार्गदर्शक हरपले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करताना दिली.
शेती, सहकार क्षेत्रात योगदान : बाळासाहेब थोरात.........
रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अनुभवी व निष्ठावान नेतृत्व गमावले आहे. अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. सरपंच पदानंतर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक, आमदार, खासदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. मिळालेल्या पदांचा वापर त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला. समाजकारणासोबतच शेती, सहकार, अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी नमुद केले.