औरंगाबाद / प्रतिनिधी

  कोरोना संसर्गामुळे यंदा गणेश विसर्जनाच्या सार्वजनिक मिरवणूकीला बंदी आहे. त्यामुळे केवळ गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी आवश्यक ती तयारी महापालिकेने केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा 11 विहिरींवर विसर्जनाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच या विसर्जन विहिरींवर गर्दी होऊ नये, यासाठी शहरात 23 ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकारण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी विहिरींवर न जाता पालिकेच्या पथकांकडे गणेशमूर्ती द्याव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

  पालिकेकडून दरवर्षी गणेश विसर्जनासाठी विसर्जन विहिरींची स्वच्छता केली जाते. तसेच विहिरींकडे जाणार्‍या रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, विहिरींचा परिसर स्वच्छ करणे, त्याठिकाणी स्टेज उभे करणे, दिव्यांची सोय करणे ही सर्व कामे दरवर्षी पालिका प्रशासन करते. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाते. यंदाही 44 लाख रुपयांची तरतूद प्रशासनाने केली आहे. या आर्थिक तरतूदीमधून शहरातील 11 विहिरी स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विहिरींच्या परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे पालिकेच्या यंत्रणेने नियोजन केले आहे. त्यानुसार स्टेज उभारणे आणि दिवाबत्तीची कामे करणे काही ठिकाणी बाकी आहे, उद्या मंगळवारी सकाळपर्यंत ही कामे पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. गणेश विसर्जनासाठी विहिरींवर गर्दी होऊ नये, यासाठी शहराच्या विविध भागात 23 ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकारल्या जातील. तसे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्या त्या ठिकाणी वाहने उभी केली जाणार असून नागरिकांकडून गणेशमूर्ती स्वीकारुन त्यांचे पालिकेच्या पथकांकडूनच सन्मानाने विसर्जन केले जाणार आहे.

या ठिकाणी स्वीकारणार गणेशमूर्ती.......

1. खडकेश्‍वर मंदिर, 2. पडेगाव, 3 सावरकर चौक समर्थनगर, 4. गुलमंडी, 5. एन-10 पोलिस कॉलनी, 6. यशोधरा कॉलनी, जिव्हेश्‍वर कॉलनी, 7. टीव्ही सेंटर शॉपिंग कॉम्प्लेक्स, 8. मध्यवर्ती कारागृहाजवळील खुली जागा, 9. एन-5 राजीव गांधी स्टेडीयम, 10. गरवारे स्टेडीयम, 11. चिकलठाणा आठवडी बाजार, 12. कामगार चौक, 13. मुकुंदवाडी बसस्टॉप, 14. गजानन महाराज मंदिर चौक, 15. सिडको कॅनॉट प्लेस, 16. सूतगिरणी चौक, 17. विद्यानगर कृत्रीम तलाव, 18. देवळाई चौक बीड बायपास, 19. जाबिंदा सिग्नल, बीडपायपास, 20. कांचनवाडी बसस्टॉप, 21. अयोध्यानगर, 22. ज्योतीनगर पाण्याच्या टाकीजवळ, 23. संत एकनाथ रंगमंदिर या जागांवर गणेश मूर्ती स्वीकारल्या जातील.

या आहेत गणेश विसर्जन विहिरी...

भावसिंगपुरा, औरंगपुरा, हडको एन- 12, हर्सूल तलाव स्मृतिवन (कृत्रिम तलाव), संघर्षनगर, संतोषीमातानगर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर, सातारा गाव, जालाननगर, ज्योतीनगर.