पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. नुकतेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तर यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्निक महापूजा होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. निवडणूक आयोगाने नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास मंजुरी दिली आहे.

यंदाही कार्तिकी शुद्ध एकादशीच्या निमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यातून पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. कार्तिकी यात्रा काळातही आषाढी प्रमाणे संचारबंदी लागू होणार असून ४ दिवस एसटी बससेवा बंद राहिल असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने अनेक पाऊले उचलली आहेत. कार्तिकी काळात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.

पंढपूरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दशमीच्या रात्री १२ वाजेपासून म्हणजेच २५ नोव्हेंबरपासून ते एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रेचा कालावधी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. कार्तिकी शुद्ध एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतून यावर्षीही दिंड्या पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुनच होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून दिंड्या निघणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.