औरंगाबाद / प्रतिनिधी

  कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शहरात कोरोना चाचण्यांची जम्बो मोहीम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवरच आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील बारा आरोग्य केंद्रांसह सहा एन्ट्री पॉइंट, दोन बसस्थानक, रेल्वेस्टेशन आणि इतर चार ठिकाणांसह एकूण 25 ठिकाणी अ‍ॅन्टिजेन टेस्ट सेंटर निश्‍चित केले आहेत. या सेंटरवर केव्हाही जावून नागरिकांना मोफत कोरोनाची अ‍ॅन्टिजेन टेस्ट करता येईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी गुरूवारी दि.3 दिली.

  मागील मागील सहा महिन्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. आजवर सुमारे 23 हजार कोरोना बाधित रुग्ण सापडले असून सातशेपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णापैकी सुमारे 19 हजार रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यात कोरोनाचा संसर्ग गतीने पसरत गेला. त्यामुळे प्रशासनाने 10 ते 18 जुलै दरम्यान शहरात कडक लॉकडाऊन घेतला होता. त्यासोबतच कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी अ‍ॅन्टिजेन टेस्टची जम्बो मोहिम हाती घेतली. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच शहराचे सहा एन्ट्री पाइंट, कोविड आणि क्वारंटाइन सेंटर, मोबाइल पथक यांच्याकरवी देखील शहरात विविध ठिकाणी शिबीर घेवून अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यातून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात यश आले. मागील दोन महिन्यापासून अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिम राबवली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने अ‍ॅनलॉक लागू केले असले तरी 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

संसर्गाचा अजून टळलेला नाही

  शहरावरील कोरोन संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळेच पालिकेने अ‍ॅन्टिजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट मोहिम सूरूच ठेवण्याचे ठरवले आहे. आयएमआरसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यकता वाटल्यास अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही 25 ठिकाणे निश्‍चित केली आहेत.

या ठिकाणी जाऊन करा चाचणी.

  सहा एन्ट्री पॉइंट : हर्सुल टी पॉइंट, दौलताबाद, नगरनाका, कांचनवाडी, झाल्टाफाटा, चिकलठाणा केंब्रिज चौक यासह, मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक, रेल्वेस्टेशन या नऊ ठिकाणी 30 सप्टेंबरपर्यंत अ‍ॅनिटजेन टेस्ट केली जाईल. शहरात पालिकेच्या भिमनगर, तापडीया, रिलायन्स मॉल, राजनगर, हर्षनगर, बायजीपूरा, शिवाजीनगर, सिडको एन-8, टिव्ही सेंटर, सिडको एन-11, सिडको एन-2 कम्युनिटी सेंटर, चिकलठाणा या बारा आरोग्य केंद्रात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अ‍ॅन्टिजेन टेस्ट केल्या जातील. याशिवाय अन्य चार ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.