औरंगाबाद/प्रतिनिधी

  कोरोनामुळे एसटी महामंडळाने सरळ सेवा भरतीने एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचार्‍यांच्या सेवांना तात्पुर्ती स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती उठवून 1300 कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. मात्र उर्वरित 3200 कर्मचार्‍यांचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे एसटी सेवा भरतीबाबत सध्या कही खुशी कही गमचे चित्र आहे.
एसटी सरळसेवा भरती 2019 मध्ये झाली होती. यात 4500 पात्र उमेदवारांपैकी 1300 उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चालक तथा वाहक पदावर नियुक्त्या दिलेल्या आहेत. तर सुमारे 3200 चालक तथा वाहक पदासाठी अद्याप प्रशिक्षण सुरू आहे. याशिवाय अनुकंपा सेवाच्या जवळपास 150 व सुमारे 82 अधिकार्‍यांचेही प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण सुरु असतानाच कोरोनाच्या काळात एसटी सेवा ठप्प झाल्यानंतर या सर्वच कर्मचार्‍यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्याचा निर्णय रद्द 17 जुलै 2020 रोजी घेण्यात आला होता. ही स्थगिती मागे घ्यावी यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारीसंघटनांतर्फे देण्यात आला होता. अखेर सरळ सेवेने रुजू झालेल्या 1300 चालक तथा वाहक आणि अनुकंपा तत्वावरील साधारण 150 प्रशिक्षणार्थीच्या स्थगिती निर्णय मागे घेतला असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली. सरळसेवा भरतीतील कर्तव्यावर हजर झालेल्या 1300 कर्मचार्‍यांची स्थगिती उठविली तसेच अनुकंपा तत्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षणही स्थगितीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही 3200 प्रशिक्षणार्थी तसेच चालक तथा वाहक पदातील 236 महिला उमेदवारांच्या संदर्भात निर्णय न घेतल्याने हे सर्वजण अद्यापही वंचित राहणार आहेत. त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

स्थगिती तात्पूर्ती, महामंडळाचा खुलासा....

राज्य शासनाने कोरोनाच्या काळात कुठल्याही कर्मचारी व कामगारांच्या वेतनात कपात करु नये असे निर्देश दिले होते. असे असतानाही शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मात्र शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत थेट कर्मचार्‍यांच्या सेवा खंडीत केल्या होत्या. या विरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर मात्र ही स्थगिती तात्पुरती असल्याचा खुलासा महामंडळाने केला होता.