उस्मानाबाद - वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून सुरु असलेले वादंग थांबायचे नाव घेत नाहीये. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुन्हा निशाणा साधला आहे.

'ऊर्जामंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरण क्लार्क म्हणून काम करावे, म्हणजे भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिले दाखवतील' अशी खरमरीत टीका दरेकर यांनी केली आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर आज उस्मानाबादमध्ये आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दरेकरांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजपा नेत्यांनी वीज बिले घेऊन माझ्या कार्यालयात यावे, मी ती बिले तपासून पाहिन असे नितीन राऊत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. वाढीव वीज बिले नसतील तर आम्ही सगळी बिले भरु असा शब्द त्यांनी द्यावा असेही ते म्हणाले होते. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला आहे.