पुणे - 'महाराष्ट्र सरकारला बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर पुत्राला पब आणि बारची चिंता आहे. सध्या सरकार या दोनच गोष्टींची अतिशय काळजी करत आहे.' असा आरोप भाजप नेते आशिष शेला यांनी केला आहे. पुण्यात शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आरोप केले.

'सध्याचे सरकार हे अकार्यक्षम आहे. पुण्याच्या कोरोना आकडेवारीबाबत मी वेगळे सांगण्याची गरज नाही. जर पब आणि रेस्टॉरंट नियम घालून उघडली जाऊ शकतात तर मंदिरेदेखील नियम घालून उघडली जाऊ शकतात. कोणीही मागणी केलेली नसताना पब आणि रेर्सटॉरंटची वेळ वाढवली. राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भाजपची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू. मात्र करोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. परंतु शाळा सुरु करण्यापूर्वी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांची बैठक घेतली नाही. शिक्षकांचेही काही प्रश्न आहेत. हे सरकार की छळवणूकीचे केंद्र?' असा सवालही शेलार यांनी विचारला.

तसेच वीजबिलाच्या मुद्द्यावरून शेलार म्हणाले, 'फडणवीस सरकारच्या काळात महावितरणने चांगल काम केले आहे. वाढलेली थकबाकी ही शेतकऱ्यांना दिलेल्या थकबाकीची मुदत दिल्याने वाढली आहे. १९ हजार कोटींची थकबाकी होती. आम्ही बाहेर पडताना ३० हजार कोटींची थकबाकी होती. ४५ लाख शेतकऱ्यांना मदत केलेली थकबाकी होती. त्याची चौकशी करताना शेतकऱ्यांना चौकशीच्या आड आणू नका, नाहीतर गाठ आमच्याशी आहे.' असेही शेलार यांनी स्पष्ट केले.