पंढरपूर - सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा ईडीमार्फत चौकशी होणार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र या चौकशीवर अजित पवारांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. अजित पवार यांनी आज पंढरपूरमध्ये जावून पाहणी केली. त्यानंतर माध्यमांनी या चौकशीबाबत प्रश्न केल्यानंतर, 'वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करत असतात, ते त्यांचे कामच आहे. मागच्या 6 ते 7 वर्षांपासून चौकशी सुरुच आहे. सध्या हा विषयी न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर बोलणे योग्य नाही.' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाची चौकशी करत होता. 2014 च्या निवडणूकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सत्ते आल्यानंतर सिंचन घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करून तुरुंगात पाठवू, असे आश्वासन दिले होते. परंतु भाजपची सत्ता आल्यानंतर ही सिंचन घोटाळ्याची चौकशी काही जास्त पुढे गेली नाही.

परंतु भाजप नेत्यांकडून अजित पवारांना सिंचन घोटाळ्यावरून लक्ष्य केले जाते. परंतु 2019च्या सत्ता स्थापनेच्या राजकिय नाट्यात अजित पवारांनी रात्रीतून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावून शपथविधी उरकला होता. त्यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून न्यायलयात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली होती. परंतु पुन्हा अजित पवार यांनी भाजपला तोंडघशी पाडत सत्तेतून पायउतार केला. त्यावेळी पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून घुमजाव करण्यात आला होता. एसीबीचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंह यांनी नजरचुकीने अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचे कोर्टात सांगितले होते.