वादग्रस्त ज्योतीनगर जलतरणचा फेर करारनामा
आयुक्तांचे आदेश : बीओटी प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना
औरंगाबाद / प्रतिनिधी
बेकायदा हुक्का व मसाज पार्लर चालविण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या ज्योतीनगर येथील जलतरण तलावाबाबत फेर करारनामा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. भाडेपट्टा पाच रुपये प्रतिचौरस मीटर ऐवजी पंधरा रुपये प्रति चौरस मीटर नुसार करारनामा करावा अशी सूचना त्यांनी केली आहे.
बीओटी (बांधा, वावरा आणि हस्तांतरीत करा) तत्वावरील शहरातील सर्वच प्रकल्प आजघडीला रखडलेल्य अवस्थेत आहे. जे प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत, त्यांकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यानेही पालिकेचे नुकसान होत आहे. आता या प्रकल्पातील त्रुटी दूर करुन हे प्रकल्प मार्गी लावा, असेही आदेश आयुक्त पांडेय यांनी गुरूवारी दि.27 घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकार्‍यांना दिले आहे. बीओटी करारांविषयीच्या आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना देखील त्यांनी केली आहे. गुरूवारी सायंकाळी त्यांनी पोलीस मेस येथे बीओटी प्रकल्प आणि कर वसुलीसंदर्भात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहर अभियंता सखाराम पानझडे याच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिडको टाऊन सेंटरयेथील बीओटी प्रकल्प पूर्ण झाला आहे. विकासकाकडून भोगवटा प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे, असे अधिकार्‍यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. शहर अभियंता पानझडे यांनी त्या प्रकल्पाची पाहणी करुन अहवाल सादर करावा, त्यांच्या अहवालानंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले. शहानुरवाडी येथील युरोपियन भाजी मार्केट बाबत विकासकाकडून 30 लाख 60 हजार रुपये आगाऊ भरुन घ्यावेत, त्याच्या सोबत करारनामा करावा, असेही त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

* वेदांतनगर, वसंतभवन अजूनही अपूर्णच
वेदांतनगर येथील क्रीडा संकुल प्रकल्पात विकासकाने नऊ महिन्याची मुदतवाढ मागीतली आहे. विहीत मुदतीत त्याने प्रकल्प पूर्ण करावा, या अटीच्या आधीन राहून मुदत वाढ देण्याची सूचनाही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांस केली. वसंत भवन येथे बहुमजली विद्युत रोहित्राचा प्रयोग करावा, सिध्दार्थ उद्यान येथील प्रकल्पाबाबत विकासकाकडून 0.5 टक्के दंडाची रक्कम, तसेच बांधकामास झालेल्या विलंबापोटी 50 लाख रुपये चार टप्प्यात वसूल करुन प्रकल्प पूर्ण करुन घ्या, असेही त्यांनी अधिकार्‍यांना आदेशित केल्याची माहिती प्रशासनाने दिली.