औरंगाबाद / प्रतिनिधी

  कोरोना आजाराची सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांना अपवादात्मक परिस्थितीतच काही अटींच्या आधीन राहून घरीच उपचार घेण्याची अर्थातच होम आयसोलेशनची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी बुधवारी दि.2 दिली. पालिकेने आतापर्यंत दोनशे जणांना होम आयसोलेशनची परवानगी दिलेली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

  शहरभरात घरीच उपचार घेणार्‍या कोरोना रूग्णांविषयी माहिती देताना डॉ. पाडळकर यांनी सांगितले की, अलीकडे होम आयसोलेशनची मागणी वाढत आहे. मात्र पालिका प्रशासन काही अटी-शर्तीच्या अधीन राहून संबंधित व्यक्तींना होम आयसोलेशनची परवानगी देत आहे. मात्र होम आयसोलेशन मागण्यापूर्वी त्या व्यक्तीने फिजिशियन डॉक्टरांचे हमी पत्र पालिकेला देणे अत्यावश्यक आहे, त्या डॉक्टरने सलग दहा दिवस त्या व्यक्तीच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी केली पाहीजे. होम आयसोलेशन मागणार्‍या व्यक्तीने पालिकेकडे फिजिशियनच्या माध्यमातून परवानगी मागताना रक्ताच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या करणे देखील अत्यावश्यक आहे. ज्या व्यक्तीला होम आयसोलेशन रहायचे आहे, त्याला त्याच्या घरात स्वतंत्र खोली, स्वतंत्र टॉयलेट - बाथरुम असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी घरात चोवीस तास एखादा व्यक्तीही उपलब्ध असणे बंधनकारक आहे. तसेच होम आयसोलेशन मागणार्‍या व्यक्तीचे वय पन्नास पेक्षा कमी असले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. पालिकेने आतापर्यंत 201 जणांना होम आयसोलेशनची परवानगी दिल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.


40 दिवसांत होऊ शकतो पुन्हा कोरोना.

उपचारातून कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा पुढील 40 दिवस पालिकेकडून पाठपुरावा केला जाणार आहे. पोस्ट कोविडचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचे नाव व पत्ता पालिकेकडे आहे. त्या आधारे आशा वर्कर्सच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. कोरोनामुक्त झालेल्याला 40 दिवसात पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.