मुंबई : टि्वटरने अभिनेत्री कंगना रानौतचे दोन टि्वटस टि्वटरवरून काढून टाकले आहेत. कंगनाच्या या टि्वट्समुळे टि्वटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने हे टि्वटस काढून टाकण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीसोबत कंगना वाद घालत आहे. टि्वटरवरुन कंगना जहरी टीका करत आहे. 

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन केलेल्या टि्वटमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. कंगनाने रिहानासह देशातील इतर सेलिब्रिटींवरही सडकून टीका केलीये. गायक, अभिनेता दिलजीत दोसांझसोबतही तिने वाद घातला आहे. तिने दिलजीतला 'खलिस्तानी' म्हटले आहे. शेतकऱ्यांबद्दलही तिने आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे अनेक युझर्सनी टि्वटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली होती. तसेच, तिच्या टि्वटर अकाऊंटवर बंदी घालण्याची देखील मागणी केली होती.

मागील महिन्यात काही तासांसाठी कंगनाचे टि्वटर अकाऊंट बंद केलेले होते. सध्या सुरु असलेल्या वादात, कंगनाने जे टि्वट केले होते, तिथे आता 'टि्वटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने हे टि्वट उपलब्ध नाही,' असा मेसेज दिसत आहे..

कंगनाने दिलजीत दोसांझला काय म्हटले?
'याला पण आपले दोन रुपये बनवायचे आहेत, याची प्लानिंग कधीपासून सुरु होती? व्हिडिओ बनवायला आणि नंतर घोषणा करायला, कमीत कमी एक महिना तर लागेल आणि हे सर्व ऑर्गेनिक आहे, यावर आपण विश्वास ठेवावा, अशी त्यांची इच्छा आहे' असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 'माझे एकच काम आहे देशभक्ती. तेच मी दिवसभर करत असते. मी तेच करत राहणार. पण खलिस्तानी तुला तुझे काम करु देणार नाही' असेही दुसऱ्या टि्वटमध्ये कंगनाने म्हटले होते.

कंगनाचा रिहानावर पलटवार...
कंगनाने टि्वट केले की, "या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही.''