मुंबई - अभिनेता सलमान खान नेहमीच कुणाची ना कुणाची मदत करण्याच्या बातम्या चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा सलमान अशाच कारणासाठी चर्चेत आला आहे. 'मंहेदी' फेम अभिनेता फराज खान सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. सलमान फराजचे सर्व मेडिकल बिल्स भरत असल्याची माहिती समोर आली आहे. विनोदवीर कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहाने याबाबत पोस्ट शेअर करून सांगितले.

काय लिहिले कश्मिराने...
'तुम्ही खरंच एक महान व्यक्ती आहात. फराज खानच्या प्रकृतीची काळजी घेतली त्याबद्दल धन्यवाद. 'फरेब' फेम अभिनेता फराज खानची प्रकृती चिंताजनक आहे आणि सलमान खान त्याच्यासोबत उभे आहेत. त्यांनी फराजला खूप मोठी मदत केली. मी सलमानची एक खरी चाहती आहे आणि नेहमीच राहिल. जर लोकांना ही पोस्ट आवडली नसेल तर मला त्याच काही वाटणार नाही. तुमच्याकडे मला अनफॉलो करण्याचा पर्याय आहे. मी आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीत भेटलेल्या लोकांपैकी एक उत्तम व्यक्ती आहे.'

'मैंने प्यार किया' या चित्रपटात सलमानने अभिनेता फराज खानला रिप्लेस केले होते. आता सलमान त्याच्या वाईट काळात त्याच्या मदतीसाठी धावून आला आहे. बंगळुरु विक्रम रुग्णालयात फराज मृत्यूशी झुंज देत आहे. त्याचे सर्व मेडिकल्सचे बिल भरण्याचा निर्णय सलमानने घेतल्याचे सांगितले जाते.

फराजच्या नातेवाईकांनी फंड-राईजर वेबसाईटव्दारे लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. नातेवाईकांनी, 'माझा प्रिय भाऊ, मित्र आणि प्रिय कलाकार आज मृत्यूशी झुंज देत आहे. त्याने आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे कलाविश्वाला समर्पित केली आहेत. पण आज त्याला जगण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. कृपया फराजच्या उपचारासाठी शक्य तितकी मदत द्या.' असे आवाहन केले होते.

फराजला मागील एक वर्षापासून छातीत संसर्ग झाला होता. त्याचा खोकला अचानक वाढल्याने तो 8 ऑक्टोबर रोजी त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेत घेवून जात असताना झटका आला. त्यात तो अनियंत्रित होवून हलू लागला. त्याला एकापाठोपाठ तीन झटके आले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईकांना कळाले की त्याच्या छातीतील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याला तीन झटके आले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, फराजच्या उपचारासाठी सुमारे 25 लाखांचा खर्च येणार आहे. त्याला 7 ते 10 दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागणार आहे.